Advertisement Advertisement

बावनबुरुजी येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची पाहणी; ‘करवंड महोत्सव’ लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी तालुक्यातील बावनबुरुज येथे भेट देत आगामी “करवंड महोत्सवा”च्या तयारीचा आढावा घेतला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विवाहस्मृतीनिमित्त आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव सर्व समाजघटकांच्या सहभागातून लोकोत्सव स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

करवंड येथे १५ एप्रिल २०२६ रोजी महाराजांच्या विवाहस्मृतीनिमित्त भव्य “करवंड महोत्सव” आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोंद्रे यांनी स्थळाला भेट देत बावन बुरुज बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुनील जवंजाळ पाटील, अरविंद बापू देशमुख, हरीरुद्र राजे इंगळे, पत्रकार गणेश निकम, अण्णासाहेब म्हळसने यांच्यासह ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर सुरोशे, माजी सरपंच प्रवीण पाटील, बिंदू इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बोंद्रे म्हणाले की, करवंड ही भूमी स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित असून महाराजांच्या विवाहामुळे या गावाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे करवंड हे केवळ एक गाव नसून शिवस्मृतींचे पवित्र केंद्रस्थान आहे. आजपर्यंत शिवजयंती, विजय दिन, गडसंवर्धन असे विविध उपक्रम झाले असले तरी विवाहस्मृतीवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव प्रथमच होत आहे. हा उत्सव केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सर्व समाजाचा लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बोंद्रे यांनी पुढे सांगितले की, या महोत्सवाच्या माध्यमातून चिखली तालुका व बुलढाणा जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा राज्य व देशपातळीवर पोहोचेल. तसेच पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल. यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!