शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका अज्ञात व्यक्तीने थेट मुख्यमंत्री कार्यालयातील पी.ए.असल्याची बतावणी करत तहसीलदार व पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
संबंधित व्यक्तीने “पी.एम.ओ. ऑफिसमधून बोलतो” असे सांगत, विघ्नहर्ता हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका गोडावूनमध्ये शासकीय रेशनचा सुमारे ४०० कट्टे तांदूळ साठवलेला असून तात्काळ कारवाई करा, असा दबाव टाकला. फोनवरून वारंवार कॉल करत दमदाटी व धमकी दिल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष चिंतामण बावणे (वय ४६) यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एन.सी. क्रमांक २८/२०२६, भादंवि कलम ३५१(४), २२१ अन्वये नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना धमकावण्याचा हा प्रकार गंभीर मानला जात असून, आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.













