मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज):
वरूड–कोनड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
मेरा बुद्रुक येथील रहिवासी इनुस शहा इसा शहा (वय ४२) व त्यांची आई रुखसाना बी इसा शहा (वय ६५) हे मजुरीचे काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना, एकभंगार भरलेला सुप्रो कंपनीचा टेम्पो (क्र. MH 25 AJ 489) भरधाव वेगात येत असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. इनुस शहा यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली असतानाही टेम्पोने त्यांना जोरदार धडक देत अंगावर पलटी घेतली.
अपघात इतका भीषण होता की इनुस शहा यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई रुखसाना बी शहा या टेम्पोखाली दबल्या गेल्या. दोघांना तातडीने चिखली येथील सावळे रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी इनुस शहा यांना मृत घोषित केले, तर रुखसाना बी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, अवघ्या वर्षभरापूर्वी या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले होते. आता माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मेरा बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत वृत्त लिहेपर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.











