बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी यशस्वीरीत्या केवायसी पूर्ण केली आहे, त्यांच्या खात्यात योजनेचा १८ वा हप्ता जमा करण्यात आला असून, उर्वरित लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी अर्जातील त्रुटी, चुकीच्या नोंदी आणि अपूर्ण माहितीमुळे अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना दिलासा देत शासनाने ३१ मार्चपर्यंत पुन्हा ई-केवायसी करण्याची अंतिम संधी दिली आहे. परिणामी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, आपला लाभ कायम ठेवण्यासाठी महिला केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची सखोल पडताळणी करण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा इतर नोकरीत असल्यास किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये चुकीने ‘शासकीय नोकरी’ असा उल्लेख आढळल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. आता अशा महिलांना पुन्हा संधी देण्यात आली असली, तरी ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्चपूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.














