Advertisement Advertisement

गावात तीन ठिकाणी दरोडा; पाठलाग करणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीवर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू…..

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काटी गावात रविवारी पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात घरफोडी व चोरी करत असलेल्या संशयित दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या रायसिंग सिताराम सोळंकी (वय ५२) यांच्यावर हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सोळंकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे काटी गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान चार ते पाच अज्ञात व्यक्ती काटी गावात घरफोडी करून चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. याचवेळी रायसिंग सोळंकी यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी एका आरोपीने मागून येत त्यांच्या डोक्यावर किंवा शरीरावर काठीने वार केला. त्यानंतर इतर आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोळंकी यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. गावकरी येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला आणि पुढे मोटारसायकलवरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तीन घरांसह दुकानांमध्ये चोरी….

दरोडेखोरांनी काटी गावातील बाळू हरिचंद्र घोंगे, गणेश मानसिंग राठोड आणि संजय रामभाऊ हिवाळे यांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. बाळू घोंगे यांच्या घरातून सोन्याचे दागिने, तर संजय हिवाळे यांच्या दुकान व गोडाऊनमधून साड्या तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत पंचनामा व तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

घटनेनंतर गावकऱ्यांनी जखमी रायसिंग सोळंकी यांना तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीस पाटील सुनील रतनसिंग चव्हाण यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना दिली.

डॉग स्क्वाड, फिंगरप्रिंट व विश्लेषण पथकाकडून तपास

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुलढाणा जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी डॉग स्क्वाड, फिंगरप्रिंट तसेच विश्लेषण पथकाची मदत घेतली जात आहे.

या घटनेमुळे काटी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, निलेश शिवराम सोळंके (वय ३०, रा. काटी, ता. नांदुरा) यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक १६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(१), ३३१(८) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!