बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने रिलायन्स मॉलमधून काजू कतलीचा बॉक्स खरेदी केला होता. घरी नेऊन बॉक्स उघडल्यानंतर मिठाईवर बुरशी आढळून आली. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये जिवंत अळ्या असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. संबंधित उत्पादनावर बॅच क्रमांक व बारकोड असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तातडीने तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या बुलढाणा पथकाने रिलायन्स मॉलमध्ये जाऊन संबंधित उत्पादनाची तपासणी केली.
पथकाकडून संबंधित काजू कतलीचा साठा, साठवणुकीची पद्धत, उत्पादन व कालबाह्यता तारीख तसेच इतर आवश्यक बाबींची तपासणी करण्यात आली. संशयित मिठाईचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, सदोष आढळलेल्या साठ्यावर जप्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, संबंधित मिठाईचा साठा किती दिवसांपासून विक्रीसाठी उपलब्ध होता? या साठ्यातील किती बॉक्स ग्राहकांपर्यंत पोहोचले? उत्पादनाची साठवणूक योग्य पद्धतीने करण्यात आली होती का? तसेच गुणवत्ता नियंत्रणाच्या नियमांचे पालन झाले होते का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
प्रयोगशाळेच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मिठाईमध्ये आढळलेल्या घटकांचे नेमके स्वरूप आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अधिक स्पष्टता होणार आहे. त्यामुळे एफडीएच्या पुढील कारवाईकडे तसेच प्रयोगशाळेच्या अहवालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
ग्राहकांनी मिठाई घेताना काळजी घ्यावी….
सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, बॅच क्रमांक, पॅकिंगची स्थिती आणि उत्पादनाची गुणवत्ता तपासावी. संशयास्पद किंवा खराब स्थितीत आढळणारे खाद्यपदार्थ खरेदी अथवा सेवन न करता संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.















