Advertisement Advertisement

बकरी मेल्याचे पैसे मागितले; पैसे दिले नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी… दुसऱ्याच दिवशी पाडळी शिंदेत  म्हातारा रक्ताच्या थारोळ्यात!

अंढेरा : (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पाडळी शिंदे येथे एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महेंद्र तुकाराम मोरे हे घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृताच्या मुलीने अंढेरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देत शेजारील व्यक्तीवर खुनाचा संशय व्यक्त केला आहे…

तक्रारदार सौ. प्रियांका राहुल खरात यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील महेंद्र तुकाराम मोरे हे पाडळी शिंदे येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीची बकरी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मृत्यूमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेच्या नुकसानभरपाईपोटी संबंधित व्यक्तीने महेंद्र मोरे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी सकाळी नातेवाईकांचा फोन आल्यानंतर प्रियांका खरात पाडळी शिंदे येथे पोहोचल्या. त्यावेळी त्यांचे वडील घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ४ ऑगस्टच्या रात्री ते ५ ऑगस्टच्या पहाटेदरम्यान संबंधित व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या मदतीने कठीण वस्तूने डोक्यावर वार करून महेंद्र मोरे यांचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पाडळी शिंदे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण आणि घटनेत कोणाचा सहभाग आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे, ठाणेदार रुपेश शक्करगे, पोलीस अधिकारी सुरेश जारवाल, नितीन पिसे, किशोर जाधव, सोनकांबळे, काकड यांच्यासह पोलीस पाटील भारत शिंदे, सरपंच राजू ठेंग आणि पत्रकार स्वप्नील शिंदे उपस्थित होते.

तक्रारीच्या आधारे अंढेरा पोलीस पुढील तपास करीत असून, या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून खुनाचे नेमके कारण आणि आरोपींबाबतचे सत्य समोर येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!