खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील अटाळी येथून एक धक्कादायक बेपत्ता प्रकरण समोर आले आहे. दळण आणते असे सांगून घराबाहेर पडलेली महिला आपल्या दोन लहान मुलांसह अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश वसंता सोनाग्रे (वय ३३) यांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी शारदा योगेश सोनाग्रे (वय ३०) ही ३ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास “दळण घेऊन येते” असे सांगून घरातून निघाली होती. तिच्यासोबत तिचा मुलगा प्रेम (वय १४) आणि मुलगी परी (वय ४) हे दोघेही होते.
मात्र, सायंकाळ उलटून रात्र झाली तरीही तिघेही घरी परतले नाहीत. नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.
बेपत्ता असताना शारदा सोनाग्रे यांनी अंगात विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस व गुलाबी रंगाचा स्टोल परिधान केला होता. त्यांच्या जवळ रियलमी कंपनीचा मोबाईल असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मिसिंगची नोंद केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संबंधित महिला व मुलांबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.













