Advertisement Advertisement

लघवीला गेला म्हणून पोऱ्याचं डोकं फोडलं गुरुजींनी! साखरखेर्ड्यात शिक्षकाची हैवानगिरी, सातवीच्या लेकराला मारहाण…..

साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील एका खासगी विद्यालयात सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. लघुशंकेस जाऊन परत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याचे डोके थेट डेस्कवर आपटल्याने तो जखमी झाला.

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील रहिवासी असलेला अनिकेत सिद्धेश्वर स्वामी हा विद्यार्थी सध्या साखरखेर्डा येथील श्रीमज्जगद्गुरु पलसिद्ध महास्वामी मठात राहून शिक्षण घेत आहे. शिवपाठाबरोबरच प्राथमिक शिक्षणासाठी तो जवळील एका खासगी शाळेत सातवीत शिकत आहे.

घटनेच्या दिवशी अनिकेत हा शिक्षकांची परवानगी घेऊन लघुशंकेस गेला होता. मात्र, परत येण्यास काहीसा विलंब झाल्याने वर्गशिक्षक राजेंद्र पडघान यांनी त्याच्याकडे विचारणा करत संतापाच्या भरात त्याचे डोके डेस्कवर आपटले. या प्रकारात अनिकेत गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.

घटनेनंतर वर्गातीलच स्वराज स्वामी व वेदांत भालेकर या विद्यार्थ्यांनी त्याला तातडीने गावातील डॉक्टरकडे नेऊन उपचार केले. जखमी व घाबरलेल्या अवस्थेत अनिकेत मठात परतल्यानंतर त्याने संपूर्ण घटना शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना सांगितली.

महाराजांनी संबंधित शिक्षकाची कानउघाडणी केली असून या प्रकारामुळे पालक व स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राज्याच्या विविध भागांतून शिक्षणासाठी मठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मठात विद्यार्थ्यांना मोफत निवास व शिक्षणाची सोय असली, तरी बाहेरील शाळांमध्ये अशा घटना घडत असल्याने संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!