साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):लग्नसराई, बाजारहाट आणि प्रवासाच्या गडबडीत नटून-थटून फिरणाऱ्या महिलांवर आता चोरट्यांचा खास डोळा आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी पुरुष चोरट्यांच्या मदतीने महिलाच चोरी करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे महिलांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात २९ जानेवारी रोजी अशीच घटना उघडकीस आली. गावातीलच एका तथाकथित महिलेने वयोवृद्ध महिलेशी गोड बोलून घरात कोण राहते, दागिने खरे आहेत की नकली याची चौकशी केली. ही महिला कायम फिरस्तीवर असून मलकापूर-पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात नेहमी दिसून येते.
ही महिला दागिने घातलेल्या महिलांशी सलगी साधून माहिती काढते आणि अलगद गळ्यातील पोत लंपास करते, असे नागरिक सांगतात. काही महिन्यांपूर्वी साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात जीवन गवई यांच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीस गेल्याची घटना घडली होती.
याशिवाय बाजारात आलेल्या महिलांचे पाकीट मारणे, मोबाईल काढणे असे प्रकारही सर्रास होत आहेत. प्रवासादरम्यान काही महिला चौकशीच्या बहाण्याने आपण कुठे जाणार, कधी परत येणार, घर कुठे आहे याची माहिती मिळवतात आणि नंतर साथीदारांच्या मदतीने पाठलाग करून चोरी-घरफोडी करतात.
आज सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखाच्या घरात गेले असून नवीन दागिना घेणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे जे दागिने आहेत ते जपून ठेवण्यासाठी सावधगिरी हाच एकमेव उपाय आहे.
तसेच महिलांनी १०-१५ वर्षांपूर्वी घेतलेल्या दागिन्यांच्या खरेदी पावत्या जपून ठेवाव्यात, कारण चोरी झाल्यानंतर पोलीस सर्वप्रथम पावतीची मागणी करतात. पावती नसल्यास तक्रार नोंदवताना अडचणी येतात आणि मौल्यवान दागिन्यांवर पाणी सोडावे लागते.














