घरात कुत्रा, मांजर पाळताय? तर नोंदणी व परवाना बंधनकारक..! डॉग-कॅट ब्रीडर आणि विक्रेत्यांनाही परवाना आवश्यक….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :घरामध्ये कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी पाळण्यासाठी नोंदणी करून वार्षिक परवाना (पेट लायसन्स) घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. मात्र बुलडाणा शहरातील बहुतांश नागरिकांनी अद्याप आपल्या पाळीव प्राण्यांची नोंदणी केलेली नसल्याचे वास्तव समोर येत आहे. दुसरीकडे, मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात पाळीव तसेच मोकाट कुत्र्यांच्या नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे.

छंद, सुरक्षा तसेच संगतीसाठी अनेक नागरिक कुत्रे-मांजरे पाळतात. मात्र नगरपालिका हद्दीतील बहुतांश प्राणीधारकांकडे आवश्यक परवाना नसल्याने मोकाट आणि पाळीव कुत्र्यांची अचूक संख्या प्रशासनासमोर येत नाही, ही गंभीर बाब ठरत आहे.
दंड व कारवाईची तरतूद
पाळीव प्राण्यांची नोंदणी व परवाना न घेतल्यास प्राणी संरक्षण अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यास कडक कारवाई तसेच पाळीव प्राण्याची सक्तीने नोंदणी करण्याची तरतूद कायद्यात आहे.

मोकाट कुत्र्यांचीही नोंदणी सुरू
पाळीव कुत्र्यांसोबतच आता मोकाट कुत्र्यांची ओळख पटवून त्यांची नोंदणी केली जात आहे. यामुळे लसीकरण, नसबंदी व जन्मनियंत्रणाच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.

नोंदणी व परवाना अनिवार्य….

कुत्रा किंवा मांजर पाळणाऱ्या प्रत्येक नागरिकाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी करून वार्षिक परवाना घेणे बंधनकारक आहे. परवाना न घेणे हा थेट नियमभंग मानला जातो.

जनजागृतीचा अभाव….

शहरात हजारो मोकाट व पाळीव कुत्रे असतानाही नोंदणीकृत पाळीव कुत्र्यांची संख्या अत्यल्प आहे. परवाना घेणे आवश्यक आहे, याबाबत अनेक नागरिक अनभिज्ञ आहेत. प्रशासनाकडून पुरेशी जनजागृती व ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक परवाना घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुख्य सचिवांना जन्मनियंत्रण, लसीकरण आणि नोंदणीबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!