मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):लग्न समारंभात महिलांमध्ये नाचण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. मौजे निपाणा (ता. मोताळा) येथे २५ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत दोघांनी मिळून युवकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दयानंद महानंद थाटे (वय २२, रा. मुरारजी नगर, पवई, मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या चुलत काकांच्या मुलाच्या लग्नासाठी निपाणा येथे आले होते. लग्नात नृत्य सुरू असताना आरोपी तेजराव दादाराव इंगळे हा दारूच्या नशेत महिलांमध्ये नाचत असल्याचे दिसून आले. “तुम्ही बायांमध्ये कशाला नाचता?” असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाले.
यावरून आरोपी तेजराव इंगळे याने दयानंद यांच्या काका भास्कर प्रकाश थाटे यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. वाद शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपी कृष्णा दादाराव इंगळे याने दयानंद यांच्या डोळ्यावर फायटरने वार केला व छातीवर चावा घेतल्याचा आरोप आहे.
इतक्यावरच न थांबता, काकांचा मुलगा राहुल सुनील थाटे मध्ये पडताच त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. कृष्णा इंगळे याने राहुलच्या डोक्यावर फायटरने वार करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४/२०२६ अन्वये आरोपी तेजराव दादाराव इंगळे व कृष्णा दादाराव इंगळे (रा. निपाणा) यांच्याविरुद्ध
कलम ११५(२), ११८(१), ३५१(२)(३), ३५२, ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












