दरोडेखोरांचा धुमाकूळ! महसूल कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दगडांचा वर्षाव; रस्ता आडवायचा घाट…

मेहकर/साखरखेर्डा : (बुलडाणा कव्हरेज न्युज)महसूल क्रीडा स्पर्धा आटोपून घरी परतत असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. १६) रात्री घडली. या हल्ल्यात तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, धनराज शिंदे या महसूल कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

बुलढाणा येथे झालेल्या महसूल क्रीडा स्पर्धेनंतर मेहकर व लोणार तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी अधिग्रहीत व खासगी वाहनांतून मुख्यालयाकडे निघाले होते. मेहकर उपविभागातील महसूल सेवक नितीन त्र्यंबक नवघरे यांच्या मालकीच्या अधिग्रहीत वाहनातून काही कर्मचारी प्रवास करत होते. दुसऱ्या वाहनात अधिकारी व महसूल सहायक, तर तिसऱ्या वाहनातून महिला कर्मचारी प्रवास करीत होत्या.

आमखेड फाट्यापासून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर रात्री सुमारे ११ वाजता अज्ञातांनी अचानक दगडफेक करत वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिन्ही वाहनांचे मिळून सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.

दरोडेखोरांनी रस्त्यावर मोठे दगड टाकून वाहतूक रोखण्याचा डाव रचला होता. पाटोदा फाट्याजवळ मुख्य रस्त्यावर प्रवासी निवाऱ्यातील बाकडे आडवे टाकून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रवासी निवाऱ्यामागील बाजूने जाणाऱ्या १० ते १५ वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

दरम्यान, सैलानी दर्शनासाठी निघालेल्या साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या वाहनाचे टायर फुटले; मात्र वाहनात मोठ्या संख्येने प्रवासी असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांचा डाव फसला.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्यासह एलसीबी पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नाही. या घटनेमुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षा वाढवण्याची जोरदार मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!