देऊळगाव घुबे येथे जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..! ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली; विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली ग्रामस्थांची मने….

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जानकीदेवी विद्यालय तथा रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेबांचा जन्मोत्सव व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली.

सकाळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ढोल पथक, लेझीम पथक व डंबेल्स पथकाच्या भव्य रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध वेशभूषा परिधान करून विद्यार्थी माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले तसेच शिवरायांचे मावळे यांच्या रूपात सहभागी झाले होते.

ढोल-ताशांच्या गजरात व “जय जिजाऊ”, “जय शिवराय” च्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.

ही रॅली गावातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यानंतर विद्यालयाच्या वतीने भव्य ढोल पथकाचे प्रात्यक्षिक, तसेच लेझीम व डंबेल्स पथकांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

विद्यार्थ्यांनी भारुडाच्या माध्यमातून पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

तसेच जानकीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाटिकेद्वारे “माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे”, स्त्रियांवरील अत्याचार, बेरोजगारी, तरुणांची होणारी फरफट व भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रभावीपणे प्रकाश टाकत जनजागृती केली.

या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष श्री. शेणफडराव घुबे, माजी सरपंच दीपक पाटील घुबे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर पाटील घुबे, माजी सभापती भानदास पाटील घुबे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश आबा घुबे, माजी सरपंच संजय मुजमुले, पोलीस पाटील हरिभाऊ जाधव, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन घुबे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.

यावेळी बोलताना शेणफडरावजी घुबे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमचे शिक्षक अहोरात्र प्रयत्नशील असतात. अशा कार्यक्रमांमधून महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याचे कार्य विद्यालय सातत्याने करत आहे, याचा मला अभिमान आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उद्धव घुबे यांनी केले. हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने राबवला जात असून पुढेही सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य हरिदास घुबे यांनी गावकरी व मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जानकीदेवी विद्यालय व रामकृष्ण विवेकानंद विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!