देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव मही येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी रात्री ८ ते १ वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, मारहाण, विनयभंग, घरफोडी, गैरवर्तन तसेच रोख रक्कम व दागिने जबरदस्तीने नेल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार १२ जानेवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी रविंद्र दादाराव मुळे (वय ३६, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मधुकर अशोक शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, सचिन हरीभाऊ शिंगणे, दिनकर रामराव शिंगणे, सिद्धेश्वर म्हस्के, भगवान समाधान शिंगणे, ऋषिकेश जगन्नाथ शिंगणे (सर्व रा. देऊळगाव मही) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून अश्लील शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी अल्पवयीन मुलीवर गैरवर्तनाचा प्रयत्न, महिलांचा विनयभंग, तसेच नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. आरोपींनी घरातून १ लाख ९१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने जबरदस्तीने नेल्याचे, वाहनाची काच फोडून नुकसान केल्याचे व घरातील कूलर फेकून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याशिवाय घर जाळून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील मधुकर अशोकराव शिंगणे (वय ३६, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविंद्र दादाराव मुळे, दादाराव मुळे, शंकर शिंगणे, गणेश शंकर शिंगणे (सर्व रा. देऊळगाव मही) यांच्यासह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार, ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांसह महिलांना मारहाण केली. यावेळी काही आरोपींनी महिलांचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे करीत असून पुढील तपास सुरू आहे. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले.











