मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशूधन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गाय, म्हैस, गोहे, बैल यांसारखी जनावरे रातोरात गायब होत असल्याने चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.
७ जानेवारीच्या रात्री खैरा येथील शेतकरी सचिन गणेश नेमाने यांच्या खैरा–टाकरखेड रस्त्यावरील गट क्रमांक २९४ मधील गुरांच्या गोठ्यातून एक म्हैस व एक गिरी जातीचा मोठा गोहा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. सकाळी गोठा रिकामा दिसताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
या घटनेनंतर ८ जानेवारी रोजी पशुपालक सचिन नेमाने यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे याच गावातील शेतकरी लहू जयराम दिवाने यांच्या गोठ्यातूनही एक गाय व एक म्हैस चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत शेंबा बीटमधील टाकरखेड, खैरा, शेंबा या गावांमध्ये शेळ्या, गाई, बैल चोरीला गेल्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. एवढेच नव्हे तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून शेती अवजारे, स्प्रिंकलर नोझल चोरीला गेल्याच्या घटनाही घडत आहेत.












