अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अंचरवाडीच्या जंगलात बेवारस जळालेली…..

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी फाट्याजवळील फॉरेस्टच्या जंगल परिसरात १० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी वाहन पूर्णतः जळालेल्या अवस्थेत बेवारस आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर दुचाकी गंभीर स्वरूपाचा गुन्हा लपविण्यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाळण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुचाकीचा बहुतांश भाग पूर्णपणे जळालेला असून वाहनाची नंबर प्लेट तोडून फेकलेली आढळून आली. तपासाअंती दुचाकीचा मूळ नोंदणी क्रमांक एमएच-२८-एजी-४९६२ असल्याचे निष्पन्न झाले असून ती राख झालेल्या अवस्थेत आढळली आहे.

दरम्यान, दुचाकीवर लावलेला नंबर वेगळ्या वाहनाचा असल्याचे निदर्शनास आले असून, बनावट नंबर प्लेटचा वापर करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून संबंधित वाहन मालकाचा शोध घेऊन चौकशी करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

या घटनेमुळे अंचरवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपासातून नेमका कोणता गुन्हा लपविण्यात आला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!