कार उलटली : दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तीन मित्र जखमी…! शेलुद–शिंदिहराळी फाट्याजवळ भीषण अपघात…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दहावीतील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.


ट्युशन संपल्यानंतर मित्राच्या घरी कार आणल्याने फिरण्यासाठी रितेश लहाने, काळे, महाडिक व उमाळकर असे चौघेजण शेलुद येथील शिक्षक कॉलनीमधून चिखली–खामगाव रोडने शिंदिहराळी फाट्यापर्यंत गेले होते. परत चिखलीकडे येत असताना अचानक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात उतरून एक-दोन पलट्या घेतल्याने हा भीषण अपघात झाला.


या अपघातात रितेश समाधान लहाने (वय १७, रा. काटोडा, ता. चिखली) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे मित्र महाडिक, उमाळकर व काळे हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक जीजे ०५ सी ९४७९६ असा आहे.
अपघाताची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनानंतर रितेशच्या पार्थिवावर त्याच्या मूळगावी काटोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


रितेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली व अपघाती मृत्यूमुळे लहाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रितेश हा अत्यंत आज्ञाधारक, मितभाषी व प्रेमळ स्वभावाचा विद्यार्थी असल्याचे परिसरातून सांगितले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हुसे व हवालदार कैलास चतरकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!