बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून दोघांनी एकावर लोखंडी फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना ६ जानेवारीच्या रात्री कोलवड फाटा (ता. बुलढाणा) येथे घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
कोलवड (ता. बुलढाणा) येथील रहिवासी व राजकीय-सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले निलेश संतोषराव पाटील (वय ४५) हे ६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एमएच-२८-बीव्ही-२४७५ क्रमांकाच्या स्कुटीने घरी जात असताना बसस्टँड चौकात एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा रस्ता अडवला. गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आदेश राठोड व सुरज पसरटे (दोघे रा. बुलढाणा) यांनी थेट लोखंडी फायटरने पाटील यांच्या डोक्यावर, नाकावर व तोंडावर सपासप वार केले.
हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पाहून ऋत्विक दसरकर, नितीन सपकाळ व श्रावण बिबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांची गर्दी वाढताच आरोपी स्कॉर्पिओतून पळून गेले. जखमी निलेश पाटील यांना तात्काळ विनोद जाधव यांच्या रिक्षातून बुलढाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे करीत आहेत.












