मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. मोताळा तालुक्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल ६१ महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी ५४ महिलांचा पोलिसांनी शोध लावला, मात्र ७ महिला अद्यापही बेपत्ता असून त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
तालुक्यात दर सहाव्या दिवशी एक महिला गायब होत असल्याचे चित्र असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद, जबरदस्तीचे लग्न, फसवणूक असे विविध पैलू समोर येत आहेत.
महिलांची संख्या अधिक, पुरुषही बेपत्ता…
महिलांबरोबरच पुरुषांचेही बेपत्ता होण्याचे प्रकार समोर आले आहेत. धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत १२ पुरुष, तर बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत १८ पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद आहे. मात्र महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.
पोलीस स्टेशननिहाय आकडेवारी…
बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीत ७० गावे असून येथून ५८ जण बेपत्ता झाले. यामध्ये ४० महिला व १८ पुरुष आहेत. पोलिसांनी ३३ महिला व १५ पुरुषांचा शोध लावला, मात्र ७ महिला व ३ पुरुष अजूनही गायब आहेत.
धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत ५२ गावे असून येथे २१ महिला व १२ पुरुष असे ३३ जण बेपत्ता झाले होते. यातील सर्व महिलांचा शोध लागला, मात्र २ पुरुष अद्याप बेपत्ता आहेत.












