सैलानी(बुलडाणा कव्हरेज न्युज)सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी अभूतपूर्व तत्परता दाखवत अवघ्या एका तासात आरोपीला बेड्या ठोकल्या, त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंध्र प्रदेश येथील पीडित महिला काही दिवसांपासून सैलानी येथे वास्तव्यास होती. रामदास गंगाराम शिंदे (वय ३८, रा. सैलानी) या आरोपीने ‘ओलांड्यावर आंघोळीला नेतो’ असा बहाणा करत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तिला शेतात नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
पीडितेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील दोन युवकांनी धाव घेत हस्तक्षेप केला व तिची सुटका केली. दरम्यान, लोकांचा जमाव वाढत असल्याचे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेनंतर पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) अन्वये रायपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार नीलेश सोळंके यांनी तातडीने तपासचक्रे फिरवत एका तासात आरोपीला अटक केली.
सैलानीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.












