बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. शहरातील शेडमध्ये उभी असलेली टाटा सफारी कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष सुरेश सावजी (रा. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची टाटा सफारी कार (क्रमांक MH 28 BW 9489) २२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास शेडमध्ये उभी होती. मात्र सकाळी वाहन दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली, पण काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अप. क्र. 1032/25 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. वाहन कोणत्या दिशेने नेले गेले, याचा शोध सुरू आहे. तपास अधिकारी राजेंद्र काळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरात वारंवार होणाऱ्या वाहन चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व चोरट्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन वाहन हस्तगत केले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.











