चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील रोहडा शेतशिवारात अज्ञात व्यक्तींनी तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्यांना आग लावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २१, २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी या घटना घडल्याचे समोर आले असून, ऐन काढणी व मळणीच्या हंगामात घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रोहडा येथील शेतकरी सुरेश अप्पा सखाराम अप्पा चितराळे यांच्या गट क्रमांक १२ मधील अडीच एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या सुडीला आग लागली. तसेच रोहडा येथील शेतकरी शे. अजीस शे. मूर्तिजा यांच्या गट क्रमांक २८२ मधील दीड एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या सुडीचेही आगीमुळे नुकसान झाले. याशिवाय कोलारा येथील शेतकरी मंगलशिंग धनशिंग सोळंकी यांच्या दोन एकर क्षेत्रातील सोयाबीनच्या सुडीला आग लागल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी वर्षभर शेतात राबून, मशागत, पेरणी, खते आणि औषधांवर खर्च करून सोयाबीनचे पीक उभे केले होते. पीक काढणीच्या टप्प्यावर आले असताना सुड्यांना आग लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना या आगीच्या घटनांमुळे त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.
या तीन घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच नारायण अप्पा चितराळे, पोलीस पाटील सुनील बुरुकुल, महंमद आरिफ आणि राहुल लव्हाळे उपस्थित होते. सोयाबीनच्या सुड्यांना आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत स्पष्टता नसून, या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.















