Advertisement Advertisement

दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला! जानेफळमध्ये शेतकऱ्याची पाच एकरांतील सोयाबीनची सुडी जाळली; अडीच लाखांचे नुकसान….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधी पावसानं दडी मारली, त्यामुळं सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातही उरलेलं पीक सोंगून दोन पैसे हातात पडतील, या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या स्वप्नांवर अज्ञात व्यक्तीने पाणी फेरले. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका शेतकऱ्याच्या पाच एकरांतील सोयाबीनच्या सुडीला आग लावण्यात आल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्याचे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी जानेफळ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेफळ येथील शेतकरी शेख लालमिया यांनी दोन हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पावसाअभावी पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जे काही पीक हाती येईल, त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, या आशेने त्यांनी सोयाबीनची काढणी केली. पाच एकरांतील सोयाबीन सोंगून त्याची सुडी शेतात रचून ठेवली होती. मात्र, मेहनतीने पिकवलेल्या या सोयाबीनला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या घटनेमुळे मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेमागे सूडभावना असल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी आग कोणी आणि कोणत्या कारणातून लावली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर शेख लालमिया यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार जानेफळ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(फ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद माळी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!