खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी अटाळी येथे घडली. एकनाथ दलपत पातोंड (वय ५८, रा. अटाळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने अटाळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अटाळी येथील गट क्रमांक २३४ मधील शेतात एकनाथ पातोंड हे ४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांचे चुलतभाऊ नागेश निवृत्ती पातोंड यांनी एकनाथ हे शेतातील विहिरीत पडल्याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रामेश्वर पालोड, संदीप मारखेडे, अनंता बावस्कर, अमोल पातोंड यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संदीप मारखेडे, विठ्ठल टेकाळे आणि शेख निसार यांनी विहिरीत उतरून एकनाथ पातोंड यांना पाण्यातून बाहेर काढले.
यानंतर अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून एकनाथ पातोंड यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पातोंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अटाळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.













