Advertisement Advertisement

राजकीय बातमी !ना तयारी, ना यंत्रणा, ना शिक्षकांशी संपर्क! पोहरे मैदानात उतरल्या अन् काँग्रेसची भिस्त फक्त चार आमदारांवर!

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी अकोल्याचे प्रकाश पोहरे यांच्या सुनेला, आदिती पोहरे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणुकीची पूर्वतयारी, शिक्षक मतदारांशी संपर्क आणि ठोस प्रचारयंत्रणेचा अभाव असल्याची चर्चा काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अमरावती विभागातील एकूण ३० आमदारांपैकी काँग्रेसकडे मोजकेच आमदार आहेत. विधानपरिषदेत धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे या मोजक्या आमदारांच्या राजकीय ताकदीवर आदिती पोहरे यांना शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः काँग्रेसचे विभागातील संघटन कमकुवत झाल्याची चर्चा असताना नव्या उमेदवारासमोर पक्षयंत्रणा उभी करण्याचे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी?

अमरावती विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत धीरज लिंगाडे यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला होता. मात्र, निवडून आल्यानंतर या प्रश्नावर अपेक्षित आक्रमक भूमिका दिसली नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी वर्गात जुन्या पेन्शनचा मुद्दा आजही संवेदनशील असताना काँग्रेसच्या विद्यमान आमदारांकडून या विषयावर प्रभावी पाठपुरावा झाला नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

त्यामुळे एकदा काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊनही अपेक्षित परिणाम दिसला नाही, तर याच मुद्द्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा का, असा प्रश्न शिक्षक मतदारांमध्ये निर्माण होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. आदिती पोहरे यांच्या प्रचारात जुन्या पेन्शनचा मुद्दा कितपत प्रभावी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसच्या संघटनेचीही परीक्षा….

अमरावती विभागात काँग्रेसचे संघटनात्मक जाळे कमकुवत झाल्याची चर्चा यापूर्वीपासूनच सुरू आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय आणि उमेदवारीची प्रक्रिया याबाबत जिल्हास्तरावरील काही पदाधिकाऱ्यांमध्येही संभ्रम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारापेक्षा पक्षाची संघटनात्मक ताकद आणि प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता काँग्रेससाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अमरावती विभागात अपेक्षित प्रभाव नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मात्र बुलढाण्याचे दत्तात्रय लहाने यांची उमेदवारी आधीच जाहीर केल्याने काँग्रेससमोर आघाडीतील मतांचे समीकरण जुळविण्याचेही आव्हान निर्माण झाले आहे.

‘छुप्या पाठिंब्या’च्या चर्चेलाही उधाण….

दरम्यान, अकोल्यातील काही भाजप नेत्यांचा आदिती पोहरे यांना छुपा पाठिंबा मिळू शकतो, अशी राजकीय चर्चा अधूनमधून रंगत आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अशा समीकरणांचा प्रत्यक्ष निवडणुकीत किती परिणाम होईल, हे सांगणे सध्या घाईचे ठरेल.

एकंदरित, काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार मैदानात उतरविल्याने पक्षाला प्रचारयंत्रणा उभी करण्यापासून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यापर्यंत मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे आदिती पोहरे यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार की पक्षाच्या कमकुवत संघटनात्मक स्थितीचा फटका बसणार, याकडे अमरावती विभागाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘आदिती पोहरे यांनीच काँग्रेसच्या पराभवाची सुपारी घेतली’ अशी चर्चा काही राजकीय वर्तुळात होत असली, तरी हा दावा सध्या राजकीय चर्चेपुरताच असून त्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!