बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, २३ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे विविध दुष्काळग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची व परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा…..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १ वाजून १० मिनिटांनी खामगाव तालुक्यातील कलोरी येथे पोहोचणार असून, तेथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर १ वाजून ३० मिनिटांनी बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे मोताळा तालुक्याकडे रवाना होतील. दुपारी २ वाजता खडकी व खामखेड, २ वाजून २० मिनिटांनी रोहिणखेड, तर २ वाजून ४५ मिनिटांनी टाकळी येथे ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ३ वाजून १० मिनिटांनी तिघ्रा परिसरात पोहोचून तेथील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करतील.
दौऱ्याच्या शेवटी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी खामगाव येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेज येथे उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचणार आहेत. तेथून हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची झालेली अवस्था आणि आवश्यक मदतीबाबत शासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.















