वीजबिल वसुलीला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; देऊळगाव महीत ‘उरूस’…!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): थकीत वीजदेयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे घडली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी मोहम्मद आकीब मोहम्मद लुकमान (वय २७, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे शासकीय कर्मचारी असून, ८ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते देऊळगाव मही येथे संतोष भानदास नागरे यांच्याकडे थकीत वीजबिलाची रक्कम वसूल करण्यासाठी गेले होते.

तक्रारीनुसार आरोपीने वीजबिल मागितल्याचा राग धरत शिवीगाळ केली व मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता “खांबाला बांधून ठेवीन” अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी तक्रारदाराचा जबाब, वैद्यकीय अहवाल व इतर कागदपत्रांच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन मिंड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!