Advertisement Advertisement

उन्हं वाढली, पाणी घटलं… आणि प्रशासन झोपलं ! मनुबाई ,मेरा, बायगाव…..या सह पाच गावांना टंचाईची भीती!

पाडळी शिंदे(बुलडाणा कव्हरेज न्युज)मेंढगाव धरणातील अत्यल्प जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, चिखली लघु पाटबंधारे विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. अवैध मोटारपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा जोडणीचे पत्र देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मेंढगाव धरणातून मेरा, मनुबाई, मेंढगाव व बायगाव बुद्रुक या गावांसाठी पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र सध्या धरणात केवळ १३ टक्के जलसाठा शिल्लक असून, येत्या काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ११ मार्च रोजी अंढेरा येथील कनिष्ठ अभियंत्यांनी शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, बायगाव बुद्रुक येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची स्थिती अंतिम टप्प्यात असल्याचे कारण देत वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी केली. त्यानुसार २७ मार्च रोजी पुन्हा वीज जोडणी करण्याचे पत्र देण्यात आले. या परस्परविरोधी निर्णयांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. अशा परिस्थितीत अवैध मोटारपंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसा सुरू राहिल्यास, नळ योजनांवर अवलंबून असलेल्या गावांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून पाण्यासाठी उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, कालव्याचे गेट अज्ञात व्यक्तीने उघडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात चिखली उपविभागीय अभियंता आकाश शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची पिके अंतिम टप्प्यात असल्यामुळे केवळ आठ दिवसांसाठी वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!