लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील वढव येथे २४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून २५ डिसेंबर रोजी लोणार पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेच्या आई नंदाबाई भीमराव घुगे (वय ४५) रा. आसोला, ता. जिंतूर, जि. परभणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सासरच्या मंडळींकडून मृत महिलेला “तुला मुलगा झाला नाही, घराला वंशाचा दिवा दिला नाही” असे म्हणत वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात येत होती व पैशांची मागणीही केली जात होती.
सासरच्या लोकांकडून होत असलेल्या या सातत्यपूर्ण छळामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर या जाचाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून लोणार पोलिस ठाण्यात अमोल विश्वनाथ सोनुने, विश्वनाथ रामा सोनुने, रामकोर विश्वनाथ सोनुने (रा. वढव, ता. लोणार), सोनु कांगणे (रा. पहुर, ता. लोणार) व शिवकन्या आघाव (रा. बोरखेडी, ता. रिसोड, जि. वाशीम) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.











