खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. १० जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४,१०० ते ५,००० रुपये, तर खासगी बाजारात ५,१०० रुपये भाव मिळाला.
गेल्या आठ दिवसांत दोन्ही बाजारांत मिळून सुमारे ६० हजार पोत्यांची आवक नोंदली गेली आहे. मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत ही आवक दुप्पट असून भावही समाधानकारक असल्याने शेतकरी बाजारात विक्रीसाठी पुढे येत आहेत.
मागील हंगामात सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होता; मात्र योग्य वेळी झडती न घेतल्याने उत्पादनात घट झाली. सुरुवातीला भाव ३,५०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्री टाळली, तर काहींनी आर्थिक अडचणींमुळे कमी दरात विक्री केली. आता मात्र भाव वाढल्याने बाजारात चांगली चहलपहल दिसून येत आहे.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रोजची आवक ४,५००–५,००० पोत्यांवरून वाढून ८,००० ते ९,००० पोत्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या सहा दिवसांत एकूण ५० ते ५०,५०० पोत्यांची आवक झाली. जय किसान खासगी बाजार समितीतही रोजची आवक १,१००–१,२०० पोत्यांवरून वाढून २,२००–२,३०० पोत्यांवर गेली आहे. येथे सोयाबीनला ४,१०० ते ५,१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
दरम्यान, कापसाच्या भावातही प्रतिक्विंटल २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. खामगाव परिसरात कापसाला ६,८०० ते ७,४०० रुपये भाव मिळत असल्याने खासगी व्यापारी गावागावातून खरेदी करत आहेत. मात्र आकोट बाजारात कापसाला ८,५०० रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याची माहिती आहे.
तुरीच्या बाबतीत मात्र प्रतिक्विंटल सुमारे २०० रुपयांची घट नोंदली गेली आहे.
थोडक्यात: भाव वाढले की पोती वाढली—सोयाबीनने खामगावचा बाजार पुन्हा गजबजला!












