देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मंडपगाव येथे शेताच्या बांधावर असलेल्या लोखंडी खुणीवरून झालेल्या वादाचा भडका उडाला. या वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला काठ्या व हातांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वर्षा संजय कदम (वय ४०, रा. मंडपगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या व त्यांचा मुलगा शेतात काम करत असताना आरोपी गोपाल दत्तात्रय देशमुख याने शेताच्या धुऱ्यावरची लोखंडी खुण वाकडी कशी झाली, असा आरोप करत वाद सुरू केला. वाद वाढताच गावातील शाळेजवळील चौकात गोपाल देशमुख याने कदम यांच्या मुलास काठीने मारहाण केली.
मुलाला वाचवण्यासाठी वर्षा कदम मध्ये पडताच बळीराम दिलीप देशमुख, सचिन गजानन देशमुख व राम शंकर देशमुख यांनीही मुलास मारहाण केली. हस्तक्षेप केल्याने आरोपींनी वर्षा कदम यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी १७ जानेवारी रोजी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.












