डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक येथे बसच्या गैरसोयीने अखेर विद्यार्थिनींचा संयम सुटला. बसथांब्यावर तासन्तास वाट पाहूनही बस येत नाही, आणि आलीच तर चालक थांबत नाही, या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनी व पालकांनी १९ जानेवारी रोजी सकाळी थेट रास्तारोको आंदोलन छेडले. यामुळे घाटबोरी–मेहकर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
अंजनी बुद्रूक, अकोला ठाकरे व हिवरा साबळे येथील विद्यार्थी दररोज मेहकर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. पूर्वी अंजनी ते मेहकर ही स्वतंत्र बस होती; मात्र मागील काही काळापासून ती बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. अंजनी गाव फाट्यापासून सुमारे एक किलोमीटर पायपीट करून विद्यार्थ्यांना बस पकडावी लागत आहे.
घाटबोरी–मेहकर व लोणी गवळी–मेहकर या बसेस आधीच प्रवाशांनीच्च भरून येत असल्याने उभे राहायलाही जागा नसते. त्यामुळे चालक व वाहक बस थांबवत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. अखेर संतप्त विद्यार्थिनी व पालकांनी घाटबोरी–मेहकर बस अडवून “बस मिळेपर्यंत गाडी सोडायची नाही” असा ठाम पवित्रा घेतला.
विद्यार्थिनींच्या आक्रमक भूमिकेमुळे एसटी महामंडळाला अखेर मेहकर येथून पर्यायी बसची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही अंशी दिलासा व्यक्त केला.
दरम्यान, मेहकर आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी सांगितले की, आगारात सध्या बसेस कमी असून प्रवासी व विद्यार्थी संख्या जास्त आहे. अंजनीसाठी स्वतंत्र बस देणे सध्या शक्य नसले तरी चालक-वाहकांनी विद्यार्थ्यांसाठी बस थांबवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बस न थांबल्यास तक्रार केल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.












