पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) —
गावातील दोन सख्ख्या भावांचा केवळ सात महिन्यांच्या अंतराने मृत्यू झाल्याने तळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून म्हातारे आई-वडील, दोन सुना आणि लहान मुले आता पूर्णपणे पोरकी झाली आहेत.
पिंप्री गवळी येथील माणिक दयाराम तळेकर यांचे मोठे पुत्र रामदास तळेकर (वय ५२, नाशिक निवासी) आणि धाकटे पुत्र विनोद तळेकर (वय ४९, जळगाव निवासी) हे दोघेही काही काळ आजारी होते. पाच वर्षांपूर्वी रामदास यांच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे थांबवले होते, तर विनोद यांना मेंदूविकार झाला होता. दोघांवरही उपचार सुरू होते.
मात्र २६ मार्च २०२५ रोजी विनोद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर सात महिन्यांनी, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठे बंधू रामदास यांचेही निधन झाले. दोन मुलांचे अशा अल्पावधीत जाणे हे तळेकर कुटुंबासाठी असह्य दुःख ठरले आहे.
सध्या दोन्ही भावांची मुले शिक्षण घेत असून, म्हातारे आई-वडील पिंप्री गवळी येथे राहतात. गावातील नागरिक या घटनेने भावविव्हल झाले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सात महिन्यांत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; म्हातारे आई-वडील, पत्नी आणि लहान मुले पोरकी; पिंप्री गवळी गाव शोकमग्न…











