समृद्धीवर काळाचा घाला! कष्टकरी विठ्ठलचा जागीच अंत; धाडसह जिल्ह्यावर शोककळा….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) काबाडकष्ट करून शेतकरी बापाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कष्टकरी विठ्ठलवर काळाने अचानक झडप घातली. समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विठ्ठलचा जागीच मृत्यू झाल्याने धाड परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सावळी येथील रहिवासी विठ्ठल पाटीलबा वाघ (वय ४०) यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. वडिलांच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीत तीन भावांचा वाटा असल्याने विठ्ठलच्या वाट्याला केवळ एक एकर जमीन आली होती. या तुटपुंज्या शेतीवर कुटुंब चालवणे कठीण असल्याने त्यांनी मोठ्या धाडसाने खाजगी कंपनीकडून कर्ज काढून एमएच-०४-जेके-९४१६ क्रमांकाची आयशर गाडी घेतली.

शेतीला जोडधंदा म्हणून वाहतुकीचा व्यवसाय करत विठ्ठल प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढत होता.

अपघात कसा झाला?

२४ डिसेंबर रोजी विठ्ठल कोपरगाव येथून रिकाम्या बाटल्यांचा माल घेऊन नागपूरच्या दिशेने निघाला होता.
२५ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास, कारंजा लाड पोलीस स्टेशन हद्दीतील टोलनाक्यापासून सुमारे १५ किमी अंतरावर त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. टायरमधील हवा तपासण्यासाठी तो खाली उतरला, त्याच वेळी पाठीमागून आलेल्या एमएच-१४-एचयू-७३९५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.

दोन वाहनांच्या मध्ये चिरडल्याने विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रक चालक संतोषसिंग याचाही मृत्यू झाला असून सहचालक अनिकेत सिंग गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांचा टाईमपास, नातेवाईकांची फरफट

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. मात्र, कारंजा लाड ग्रामीण पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत विठ्ठलच्या नातेवाईकांना अक्षरशः फरफट केली.

सकाळी साडेसात वाजता पोलीस स्टेशनला पोहोचूनही फिर्याद तब्बल ११ वाजेपर्यंत दाखल केली नाही. “माझी नाही, त्याची ड्युटी आहे” असे सांगत अधिकारी आणि अंमलदारांनी हात झटकले. या प्रकारामुळे दुःखाच्या काळातही विठ्ठलच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!