साखरखेर्ड्यात ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिकची आत्महत्या; परिसरात खळबळ…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):साखरखेर्डा येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात राहणाऱ्या ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली. शाम जयराम अवचार असे मृतकाचे नाव आहे.शाम अवचार हा साखरखेर्डा येथे मोटारसायकल मॅकनिक म्हणून काम करत होता. हातात उत्तम कौशल्य असल्याने परिसरातील अनेक ग्राहक त्याच्याशी जोडले गेले होते. व्यवसायही सुरळीत सुरू असताना त्याने अचानक टोकाचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी शाम अवचार हा साखरखेर्डा–लव्हाळा रोडवरील माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या शेतात असलेल्या क्रिकेट खेळण्याच्या जागेवर गेला. तेथील एका लिंबाच्या झाडाला दोर बांधून त्याने गळफास घेतला. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पीएसआय गणेश डोईफोडे, बिट जमादार बाजीराव खरात यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मृतकाचे मामेभाऊ विजय हरिभाऊ जैवळ यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!