मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –मोताळा ते बुलडाणा मार्गावरील राजूर घाटात भरधाव अॅपे आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बालाजी मंदिराजवळ घडला.
बुलडाण्याहून प्रवासी घेऊन एमएच २८ सी ११९२ क्रमांकाचा अॅपे मोताळ्याकडे जात होता. त्याच वेळी समोरून येणाऱ्या एमएच २७ एजी ७९३ क्रमांकाच्या दुचाकीला अॅपेमधून जोरदार धडक बसली. या अपघातात अमरावती जिल्ह्यातील दुचाकीस्वार वैभव वाठ हा जागीच ठार झाला.
अपघातात अॅपेमधील गजानन जवरे, रेखा जवरे (रा. अंत्री), कविता पुरुषोत्तम गायगोळ, श्रावणी गायगोळ (वय १२) आणि सोहम नामदेव काकर (रा. राजूर) हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. जखरीया देशमुख आणि रुग्णवाहिका चालक अंकुश वाघ हे बुलडाण्याहून मोताळ्याकडे जात असताना घाटात गर्दी दिसल्याने थांबले. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णवाहिकेतून बुलडाण्यात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातामुळे राजूर घाट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.













