Advertisement Advertisement

परीक्षेसाठी घरातून बाहेर पडली; मात्र सायंकाळपर्यंत ती घरी आलीच नाही…! मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर समाजात बदनामी होईल, या भीतीने मानसिक तणावात सापडलेल्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली.

धाड परिसरातील एका गावातील ही विद्यार्थिनी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी धाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रुईखेड मायंबा येथील २२ वर्षीय तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. सदर विद्यार्थिनी दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने व समाजातील बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीचे वडील तीव्र मानसिक तणावात सापडले होते. याच तणावातून त्यांनी विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला असून, संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. धाड पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले आहे.

दरम्यान, गेल्या एक आठवड्यात जिल्ह्यात पाच महिला व युवती बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!