Advertisement Advertisement

मायलेकाचा दुर्दैवी अंत : बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला आग, ७ वर्षीय ओमचा होरपळून मृत्यू; धक्क्याने आईचाही अंत…..

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नियतीने एका आनंदी कुटुंबावर क्रूर घाव घालत मायलेकाचे जिव्हाळ्याचे नाते क्षणात हिरावून घेतले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओम संदीप होले याचा होरपळून मृत्यू झाला. तर मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच अंथरुणाला खिळलेल्या आई वनिता संदीप होले (वय ३२) यांनीही असह्य धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना हरणखेड येथे २२ फेब्रुवारी रोजी घडली.


शेतकरी संदीप होले हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा ओम वडिलांना घरी बोलावण्यासाठी शेतात आला. त्यावेळी तुरीच्या पेंढ्या गोळा करून बैलगाडीवर रचण्यात आल्या होत्या. निरागस ओम त्या गंजीवर बसलेला असताना अचानक परिसरात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यातील ठिणगी वाऱ्याच्या झोतामुळे उडून तुरीच्या कोरड्या पेंढ्यांवर पडली.


क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बैलगाडी आगीच्या विळख्यात सापडली. संदीप होले यांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक मारली. गावकरी तत्काळ घटनास्थळी धावले, मात्र आगीचा भडका प्रचंड असल्याने ओम गंभीररीत्या भाजला. त्याला तातडीने मलकापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.


दरम्यान, मुलाच्या मृत्यूची वार्ता घरी समजताच आधीपासून आजारी असलेल्या आई वनिता होले यांना जबर मानसिक धक्का बसला. लेकराच्या विरहाचे दुःख सहन न झाल्याने त्यांनीही २३ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.


मायलेकांवर २३ फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने हरणखेडसह संपूर्ण पंचक्रोशी सुन्न झाली असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ दाटून आली आहे. एका निष्पाप बालकाचा आणि मायेच्या सावलीचा असा दुर्दैवी अंत समाजमन हेलावून टाकणारा ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!