मस धरणाच्या काठी मानवी सांगाडा आढळला; रामनगर-विहिगाव परिसरात खळबळ….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): विहिगाव तालुक्यातील रामनगर शिवारात असलेल्या मस धरणाच्या काठावर मानवी सांगाडा आढळून आल्याची धक्कादायक घटना शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी महेंद्रसिंग मुख्त्यारसिंग राठोड (वय ५२) हे शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास शेतातील पाणीपुरवठा योजनेचा वीजपंप सुरू करण्यासाठी मस धरण परिसरात गेले होते. यावेळी धरणाच्या काठावरील चिखलात त्यांना मानवी कवटी व हाडे विखुरलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच जवळच काही फाटके कपडेही आढळून आले.


हा प्रकार पाहून घाबरलेल्या राठोड यांनी तात्काळ खामगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे कुजून केवळ सांगाडा उरलेला असल्याने मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.


याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १९४ बीएनएसएस अंतर्गत मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


दरम्यान, परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!