खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पातोंडा गावात शेजारील वादातून दाम्पत्यावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना १४ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी आम्रपाली सतिष तायडे (वय ३१, रा. पेडाका, पातोंडा) यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी भास्कर दौलत तायडे, पंकज भास्कर तायडे आणि मधुकर दौलत तायडे (सर्व रा. पातोंडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, फिर्यादीचे पती सतिष तायडे यांनी आरोपी पंकज तायडे यांना त्यांच्या सासऱ्यांच्या घरात झोपलेले पाहिल्याने कारण विचारले. यावरून आरोपी भास्कर व पंकज संतापले आणि त्यांनी सतिष तायडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
मारहाणी दरम्यान लोखंडी पाइपने त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करण्यात आला. तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण झाल्याचे नमूद आहे. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम्रपाली तायडे यांनाही आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीचा तोंडी अहवाल आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.














