चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राजकारणात नेहमीच उत्सव-कार्यक्रमांच्या निमित्ताने पोस्टरबाजीचा ट्रेंड दिसून येतो. मात्र चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील भाजपा नेते विष्णु घुबे यांनी पोस्टरबाजीऐवजी लोकांच्या मदतीचा मार्ग निवडला आहे.
चार दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील स्व. चेतन बोर्डे हा युवक नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आणि दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेनंतर विष्णु घुबे यांनी कुठल्याही सोहळ्याचे किंवा उत्सवाचे पोस्टर न लावता, बोर्डे कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले आणि आर्थिक मदत दिली.
तसेच, इसरुळ येथील नाडे कुटुंबावर मोठे संकट आले आहे. कुटुंबातील दोघे – पती-पत्नी आजाराने दगावले. त्यामुळे त्यांच्या सागर रमेश नाडे आणि सचिन रमेश नाडे या दोन भावंडांचे आधार व छत्र हरवले. या मुलांच्या शिक्षणासाठी घुबे यांनी शालेय साहित्य आणि एक महिन्याचा किराणा देऊन मदतीचा हात दिला.
या सामाजिक कार्यावेळी इसरुळ गावातील रंगनाथ वरपे, रंगनाथ भुतेकर, छत्रकांत भुतेकर, दत्ता भुतेकर, भगवान नाडे, समाधान भुतेकर तसेच शेळगाव आटोळ येथील भाजपा नेते संदीप बोर्डे, अंबादास आटोळे, श्रीराम खर्डे, रामदास जोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.