अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिली तर थेट पालकांवर गुन्हा…! चिखली पोलिसांचा कडक इशारा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अल्पवयीन मुलांकडून होणारी जीवघेणी स्टंटबाजी आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका लक्षात घेता चिखली पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना दुचाकी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चिखलीचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी दिला आहे.

शहरातील मुख्य रस्ते, गजबजलेले चौक तसेच शाळा, महाविद्यालये व खासगी शिकवणी वर्ग परिसरात अल्पवयीन मुले भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळेत हे प्रकार वाढत असून पादचारी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अल्पवयीन दुचाकीस्वार आढळून आल्यास केवळ त्या मुलांवरच नव्हे, तर संबंधित पालकांवरही मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे ठाणेदार गावंडे यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा सामाजिक हस्तक्षेप पोलीस प्रशासन खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केवळ वाहतूक नियमभंगच नव्हे तर शहरातील कॅफे, हुल्लडबाजी, सार्वजनिक शांततेचा भंग करणारे प्रकार आणि इतर अनिष्ट घटनांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. कॅफेमध्ये आक्षेपार्ह किंवा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, महिला व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण देण्यासाठी चिखली पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये आले असून नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हट्टापोटी त्यांना वाहने देऊन स्वतःच संकट ओढवून घेऊ नये व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही ठाणेदार भूषण गावंडे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!