देऊळगाव राजात बियर बार फोडून २.६ लाखांची दारू लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शहरातील जाफ्राबाद रोडवरील एका मद्यपानगृहाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे २ लाख ९ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, त्यात २.६ लाख रुपये किमतीची विदेशी दारू समाविष्ट आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

याबाबत जनार्धन बाबुराव शिवरकर (वय ४०, रा. शिंगणे गनर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली. चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व विदेशी दारूसह अन्य साहित्य चोरून नेले. तसेच चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


या प्रकरणी २७ जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एच. पटेल पुढील तपास करीत आहेत.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यात अलीकडील काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मंदिरांमध्येही गेल्या आठवड्यात चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोरटे पकडले असतानाच ही नवी घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!