बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्याची शांत, संयमी अशी ओळख आता हळूहळू पुसट होत चालली असून वाढत्या लोकसंख्येसोबतच गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी, दरोडा, फसवणूक, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांनी जिल्ह्याला हादरवून सोडले आहे.
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ५३ खुनांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी हा आकडा ४५ होता. मात्र नोव्हेंबर महिन्याचा तुलनात्मक विचार केल्यास यंदा खुनांच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांत मात्र तब्बल ३३ ने वाढ झाली असून एकूण ८८ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
चोरी-घरफोड्यांचा सुळसुळाट….
सरत्या वर्षात चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी कळस गाठला आहे. जिल्ह्यात ९५८ चोरीचे गुन्हे दाखल झाले असून त्यातील २१९ घरफोड्या आहेत. विशेष म्हणजे दिवसा होणाऱ्या घरफोडीपेक्षा रात्रीच्या घरफोड्यांचे प्रमाण अधिक (१८१ गुन्हे) असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.
वाहन चोरीच्या घटनांमध्ये मात्र दिलासादायक चित्र असून गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा ३०८ वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच शस्त्र कायद्यान्वये ४२ गुन्हे दाखल करून पोलिसांनी अवैध शस्त्रांवर चांगलीच जरब बसवली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता जिल्ह्यात चिंताजनक स्थिती आहे. सरत्या वर्षात १२९ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले असून गेल्या वर्षी हा आकडा ११६ होता. विनयभंगाच्या घटनांमध्ये मात्र किंचित घट झाली असून गेल्या वर्षीच्या ४०२ प्रकरणांच्या तुलनेत यंदा ३८८ गुन्हे नोंदवले गेले आहेत.
फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असून नोव्हेंबर महिन्यातच ९ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. अपघातातून मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या निष्काळजीपणाच्या ६ प्रकरणांची १०० टक्के उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
‘टिम नीलेश तांबे’ ठरतेय भारी…
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्व ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या पथकाने अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम राबवली आहे.
या मोहिमेत जुगाराचे १,७७१ तर दारूबंदीचे ४,४८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईत भाग एक ते पाचमधील ३,७२९ गुन्ह्यांपैकी ८५ टक्के, तर भाग सहामधील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दल यशस्वी ठरले आहे.
एकीकडे गुन्हेगारी वाढत असली तरी दुसरीकडे बुलढाणा पोलीस दलाची कामगिरीही तितकीच दमदार ठरत असून ‘टिम नीलेश तांबे’ कार्यक्षमतेच्या कसोटीवर खरे उतरत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.











