चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवक नेते शेख जाकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांच्यावर संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.
शेख जाकीर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून युवक काँग्रेसच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. शहरातील युवकांना संघटित करणे, काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहोचवणे तसेच सामाजिक, शैक्षणिक व युवकांशी संबंधित प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीप्रसंगी चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, न प विरोधी पक्षनेते डॉक्टर मोहम्मद इसरार, सभापती डॉक्टर संतोष वानखेडे, सचिन बोंद्रे, विष्णू पाटील कुळसुंदर, गोपाल देवडे प्रदीप पाचरवाल शिवनारायण म्ह्स्के, शिवराज पाटील, किशोर साखरे, विश्वदीप पडोळ यांची उपस्थिती होती.
संघटन बांधणीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची : राहुल भाऊ बोंद्रे
यावेळी बोलताना राहुलभाऊ बोंद्रे यांनी युवक काँग्रेस ही पक्षाची ताकद असून संघटन बांधणीसाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. शेख जाकीर यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहर युवक काँग्रेस अधिक गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नियुक्तीनंतर शेख जाकीर यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत, युवकांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीचे शहरात सर्वत्र स्वागत होत असून विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















