Advertisement Advertisement

पैशांवरून दोन गटांत राडा! मारहाण, शिवीगाळ अन् जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप; चाकूने वार केल्याचाही दावा, तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार!

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे पैशांच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाने गावात चर्चेला उधाण आले असून, दोन्ही बाजूंनी अंढेरा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. एका बाजूने मारहाण, शिवीगाळ आणि चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे, तर दुसऱ्या बाजूने विनयभंगासह मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारींच्या आधारे स्वतंत्र गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

पहिल्या तक्रारीत चाकूने वार केल्याचा आरोप!

अंढेरा पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या पहिल्या तक्रारीनुसार, अंचरवाडी येथील हरिभाऊ रामभाऊ शिंगणे (वय ४९) यांनी पैशांच्या कारणावरून वाद झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात रेणुका अंकुश कुहे, शिवराज अंकुश कुहे आणि दत्तात्रेय धोंडू कुहे यांच्यावर मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, आरोपींपैकी एकाने चाकूने पोटावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार!

दरम्यान, याच घटनेच्या अनुषंगाने रेणुका अंकुश कुहे (वय ३०, रा. अंचरवाडी) यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हरिभाऊ रामभाऊ शिंगणे यांनी वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, ज्योती हरिभाऊ शिंगणे, सुनीता अर्जुन शिंगणे आणि वैभव नामदेव शिंगणे यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरूनही अंढेरा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदविला आहे.

दोन्ही तक्रारींचा तपास सुरू….

पैशांच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे प्रकरण आता परस्परविरोधी तक्रारींपर्यंत पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप केले असून, या प्रकरणात नेमके काय घडले, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. अंढेरा पोलीस या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!