सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग परिसरात प्रस्तावित कृषी समृद्धी केंद्रांच्या मुद्द्यावर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत उपसमितीची तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
आमदार कायंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, समृद्धी महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या नव्या बाजारपेठा आणि कृषी समृद्धी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊन आर्थिक फायदा होण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे. मात्र, निर्णयप्रक्रियेला विलंब होत असल्याने संबंधित भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नवनगर अंतर्गत प्रस्तावित तीन कृषी समृद्धी केंद्रांचे प्रशासकीय काम पूर्ण झाले असून संबंधित अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये धोते, लखागंगा, बाबतरा, पुरणगाव, धायगाव, जांबरगाव, सावरगाव माठ, निमखेड, गोगाव आणि नरीराबाद या गावांचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास जमीन संपादन प्रक्रिया वेगाने सुरू होऊन कृषी समृद्धी केंद्रांची उभारणी झपाट्याने पूर्ण होईल, असा विश्वास आमदार कायंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या केंद्रांमुळे महामार्गालगतची कृषी अर्थव्यवस्था मजबूत होऊन स्थानिक शेतकऱ्यांना नवीन रोजगार आणि बाजारपेठ उपलब्ध होईल, असा दावा देखील करण्यात आला आहे.
आता मुख्यमंत्री स्तरावर बैठक कधी होते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर नेमका काय निर्णय होतो, याकडे सिंदखेड राजा परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे














