बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यात आज मंगळवार, १० फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होणार असून जिल्ह्यातील ११७ परीक्षा केंद्रांवर एकूण ३५,२११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
जिल्ह्यात बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. परीक्षा पारदर्शक, भयमुक्त आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, कॉम्प्युटर सेंटर व मोबाईल दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
८ भरारी पथकांची तैनाती…..
जिल्ह्यात एकूण ८ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचे दक्षता पथक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पथक, पोलीस अधीक्षकांचे पथक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा समावेश आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठे पथक तैनात करण्यात आले असून हे पथक पेपर सुरू होण्याच्या किमान एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहणार आहे. गोपनीयता व शिस्त राखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रे व १६ परिरक्षक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, पालकांनी आपल्या पाल्याला कोणताही ताण न देता सकारात्मक व तणावमुक्त वातावरणात परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन दक्षता समितीच्यावतीने करण्यात आले आहे.














