Advertisement Advertisement

लोणारमध्ये विवाह नोंदणीची ऑनलाइन सुविधा सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोणार शहरातील नागरिकांची विवाह नोंदणीसाठी होणारी धावपळ थांबवून विवाह नोंदणीची ऑनलाइन सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)चे शहराध्यक्ष तौफिक हाजी अब्दुल लतीफ कुरेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे.

विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेसाठी नागरिकांना वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून मनस्तापही सहन करावा लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये विवाह नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असताना लोणार शहरात ही सुविधा प्रभावीपणे सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ऑनलाइन सुविधा सुरू झाल्यास नागरिकांची कार्यालयातील गर्दी कमी होऊन वेळेची बचत होईल. तसेच विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र विविध शासकीय तसेच वैयक्तिक कामांसाठी आवश्यक असल्याने नागरिकांना ही सुविधा सहज उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे.

यासाठी प्रशासनाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करून संबंधित वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधावा, अशी मागणीही त्यांनी केली. नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी लोणार शहरात विवाह नोंदणीची ऑनलाइन सुविधा तातडीने सुरू करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मागणीची तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या न्याय्य मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही तौफिक कुरेशी यांनी प्रशासनाला दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!